Wednesday, April 10, 2024

संवाद ..बाबांसोबत

 

 

संवाद ..बाबांसोबत

 (पूर्वप्रसिद्धी : पुरुष-उवाच दिवाळी अंक 2024)

लेखक : डॉ. पराग वसेकर

 

प्रिय बाबा,

 ३० सप्टेंबर २०२२, अखेर तो दिवस उगवलाच. हे असे कधी तरी होऊ शकते ही धास्ती खरे तर गेले कित्येक दिवस होती. नऊ वर्षांपूर्वी तुम्हाला हृदयविकाराचा त्रास सुरु झाला आणि तेव्हापासूनच तुमच्या तब्येतीत चढ-उतार होत होते. खरे तर तुमच्या इच्छाशक्तीमुळे आणि शिस्तशीर राहणीमानामुळे गेली नऊ वर्षे तुम्ही व्यवस्थित तरुन नेलीत. विशेषतः गेली तीन-चार वर्षे, आणि तेही कोरोनाच्या काळात तुम्ही उत्तम राहिलात. कोरोना थोडाफार निवळल्यानंतर जवळपास तीन वर्षांच्या अंतराने आपण तुमचे अनेक वर्षांचे मित्र  डॉक्टर काब्दे यांच्याकडे  चेकअप साठी गेलो होतो.  ज्या पद्धतशीरपणे तुम्ही स्वतःच्या तब्येतीची काळजी घेत होतात, ते पाहून डॉक्टर देखील आश्चर्यचकित झाले. मात्र तुमच्या इच्छाशक्तीला किंवा डॉक्टरांच्या प्रयत्नांनादेखील मर्यादा होत्या . गेली काही वर्षे कमकुवत झालेले तुमचे हृदय तीस तारखेला रात्री साडेअकरा वाजता अखेर थांबले. तुम्ही शांतपणे निरोप घेतलात. मला आठवलं, मोठ्याई (आजी) आणि अण्णा ( आजोबा ) गेल्यानंतर तुम्ही माझी समजूत काढली होती,  अरे आज ना उद्या हे होणारच होते. त्यांचे वय झाले होते. आजारपणाचा त्यांना आणखी जास्त त्रास झाला नाही हे त्यांच्या दृष्टीने चांगले नव्हे का?’   भविष्यकाळासाठी जणू तुम्ही माझ्या मनाची तयारी करत होतात.  त्यादिवशी हे सगळे अचानक घडले आणि काही उपचार करण्याची संधीच मिळाली नाही. तुम्हाला आजारपणाचा आणखी त्रास नाही झाला आणि शेवट शांतपणे झाला तसेच तुमची नेत्रदान आणि देहदानाची इच्छा पूर्ण झाली ही माझ्या दृष्टीने समाधानाची गोष्ट होती. तीस तारखेला भारतातील मध्यरात्री फोन आला तेव्हाच मनात शंकेची पाल चुकचुकली. फोनवर आपले अनेक वर्षांचे शेजारी डॉक्टर राठी होते. मी काय ते ओळखले आणि तातडीने एअरपोर्ट गाठले.

प्रवासात असताना तुमच्या गेल्या चाळीस-पंचेचाळीस वर्षातील आठवणी  डोळ्यांसमोरून तरळून गेल्या. माझी पहिली आठवण म्हणजे मी साधारण दोन-तीन वर्षांचा होईपर्यंतची.. तुम्ही गच्चीवर आरामखुर्चीत पुस्तक वाचत बसायचा,  मी तुमच्या मांडीवर उडी मारून आणि तुमच्या लुंगीचा झोपाळा करून त्यात जाऊन बसायचो. शिडशिडीत,  उंच शरीरयष्टी, जवळपास खांद्यापर्यंत रुळणारे केस,  मोठ्या फ्रेमचा चष्मा आणि व्यवस्थित ग्रूम केलेली दाढी असे काहीसे हटके तुमचे व्यक्तिमत्व होते. असा हा मोजके बोलणारा,  वरकरणी काहीसे गंभीर वाटणारा आणि हटके दिसणारा दाढीवाला माणूस आपला बाबा आहे ही ओळख लहानपणापासून होतीच,  मात्र केवळ दिसण्यातच नव्हे तर एक माणूस म्हणून आणि एक बाप म्हणूनही तुम्ही किती वेगळे होता हे मी जसा मोठा होत गेलो तसे तसे उमगत गेले.

मला आठवतंय ..मी दुसरीत होतो, शाळेत मराठीचा तास चालू होता. त्यादिवशी सरांनी एक कविता शिकवायला घेतली होती. त्या कवितेचे शीर्षक होतं 'पाहुणे'. कविता शिकवता शिकवता सर अचानक थांबले आणि माझ्याकडे पाहून सगळ्या वर्गाला उद्देशून म्हणाले, " बाळांनो, आज आपण जी  कविता शिकत आहोत ती परागच्या बाबांनी लिहिली आहे बरं का !" सगळ्या वर्गाच्या चेहऱ्यावर आश्चर्यमिश्रित कौतुक होते. आपल्या बाबांची कविता आपले सारे मित्र-मैत्रिणी शिकत आहेत याचा कोण आनंद मला झाला होता ! मी घरी येऊन तुम्हाला सांगितले  तेव्हा तुम्ही नेहमीप्रमाणे गालातल्या गालात हसलात.

मी जसजसा मोठा होत गेलो तसे तसे तुम्ही एक माणूस म्हणून मला आकळत गेलात आणि कुणाचा वारसा आपल्याकडे आला आहे हे उमगत गेले. तुम्ही आयुष्य किती सचोटीने जगलात ! तुमच्या वागण्या-बोलण्यात संयमितपणा आणि उमदेपणा होता. विचारांत श्रीमंती होती. तुमचा जगाकडे, माणसांकडे पाहण्याचा दृष्टिकोन प्रगल्भ होता.  तुमचे विचार आधुनिक आणि बुद्धिवादी होते. शिवाय तुमच्या व्यक्तिमत्वातील या वेगळेपणाचा जरादेखील अभिनिवेश तुमच्या वागण्या- बोलण्यात नव्हता.  मी माझ्या तत्त्वांनुसार जगतो आणि मला योग्य वाटेल ते करतो; इतरांचे वेगळेपण मला मान्य आहे, हे आणि एवढेच तुम्हाला अभिप्रेत असायचे आणि त्यात कुठलीही प्रौढी नसायची. तुम्ही सडेतोड, स्पष्टवक्ते मात्र तेवढेच संवेदनशीलही होतात. संकुचितपणाचे आणि छोट्या छोट्या गोष्टींत अडकून पडण्याचे तुम्हाला वावडे होते. तुमच्या विचारांचा पैस व्यापक होता. ज्या वैचारिक उंचीवर तुम्ही पोहोचला होतात तिथवरून इतरांच्या वैचारिक  मर्यादा  तुम्हाला निश्चितच जाणवत असणार. मात्र तो विषय तुम्ही तिथेच सोडून द्यायचात. माणसांविषयी, त्यांच्यातल्या न्यूनांविषयी बोलायला तुम्हाला फारसे आवडायचे नाही. नातेसंबंधांचे किंवा परिस्थितीचे प्रचलित समजुतींपलीकडे जाऊन आकलन करण्याची क्षमता; माणसाकडे केवळ एक व्यवस्था म्हणून न बघता माणूस म्हणून बघण्याची निकोप दृष्टी आणि चूक आणि बरोबर या पलीकडे जाऊन गुंतागुंत समजून घेण्याची सहिष्णुता तुमच्याकडे होती. आपली मूल्ये इतरांवर लादणे, आपल्यापेक्षा वेगळ्या विचारांच्या माणसांना तुच्छ लेखणे, त्यांची खिल्ली उडवणे, असल्या प्रकारांपासून तुम्ही कोसों दूर होता. तुमच्या एकंदर व्यवहारात एक निर्विषपणा होता जो अधिकच स्पर्शून जायचा.  व्यावहारिकतेचे तुम्हाला वावडे नसले तरी जगण्यात उठसुठ व्यावहारिक निकष लावणाऱ्यांचे तुम्हाला आश्चर्य वाटे,  मात्र ते तेव्हढ्यापुरतेच. नंतर त्याची वाच्यताही तुम्ही टाळायचात. आयुष्यात अनेक वेळा कसोटीच्या प्रसंगांत तुम्ही आपले संतुलन आणि संवेदनशीलता कधीच गमावले नाहीत. एखादा माणूस मनातून उतारला की जरा फटकून आणि अंतर ठेऊन वागण्याचा माझा स्वभाव तर माणूस हे गुंतागुंतीचे रसायन आहे आणि त्याच्यातील चांगुलपणाचा सतत शोध घेत राहिला पाहिजे ही तुमची भूमिका. कॉलेजमध्ये असताना कधीतरी मी विवेकनिष्ठ विचारपद्धती आणि त्यावर आधारित उपचारपद्धतीविषयी वाचले आणि असे लक्षात आले की विवेकनिष्ठ विचारांचा चालता-बोलता परिपाठ तर आपल्या घरातच आहे. तुमच्या वागण्यातून विवेकवादी विचारांचा धडा आम्हाला आपसूक मिळाला होता. तुमच्या व्यक्तिमत्त्वातील चांगुलपणाचे, सुसंस्कृतपणाचे आणि उमदेपणाचे संस्कार नकळतपणे आमच्यात झिरपत गेले.

एक बाप म्हणून कितीतरी वेगळ्या पद्धतीने तुम्ही आम्हाला वाढवलेत. लहानपणी मारणे, रागावणे हे तर दूरच मात्र अनावश्यक सल्ले, सूचनादेखील तुम्ही कधी दिल्या नाहीत. आपल्या इच्छा कधीही मुलांवर लादल्या नाहीत. आम्हाला मोकळेपणा दिलात,  निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिलेत. त्यामुळे आजूबाजूला काहीशा सरंजामी मूल्यांचा प्रभाव असलेल्या कुटुंबांतील मुलांना सतत, अगदी मोठे झाल्यावरही 'पॅट्रनाईझ' केले जाते हे बघून सुरुवातीला सांस्कृतिक धक्के बसायचे आणि ज्या लोकशाही वातावरणात तुम्ही आम्हाला वाढवले, याचे महत्त्व अधिकच जाणवू लागायचे तसेच या स्वातंत्र्यासोबत आलेल्या जबाबदारीची जाणीव व्हायची.  गरज पडली तर मोकळेपणाने तुम्ही चर्चा करायचात. एखाद्या गोष्टीला अनेक बाजू, कंगोरे असू शकतात याची जाणीव करून देऊन आणि निर्णय एकांगी होणार नाही याची खात्री करून मग निर्णय आमच्यावर सोडून द्यायचात. मला आठवतंय मी काही वेळा संभ्रमात असताना तुम्ही सांगायचात ,' तुझ्या तत्त्वांत बसत असेल तरच एखादी गोष्ट कर वा करू नको.  मात्र एखादी गोष्ट मिळवण्यासाठी जी किंमत आपण मोजत आहोत तितकी ती गोष्ट मोठी आहे का याचा जरून विचार कर '.  माझ्या वाढत्या वयात त्या वयानुरूप मी स्वप्नाळूपणाकडे आणि काहीशा बंडखोरीकडे झुकलेला तर तुम्ही सतत मोजक्या शब्दांतून आणि बहुतेक वेळा तर तुमच्या धीरगंभीर मौनातूनच मला वास्तवाचे भान आणणार. जगाकडे केवळ काळे-पांढरे याच दृष्टिकोनातून बघू नये. एखाद्या व्यक्तीचे किंवा घटनेचे अनेक पदर असू शकतात,  त्यामुळे कुठलीही बाब वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून कशी तपासावी आणि चटकन निष्कर्ष काढून मोकळे होऊ नये,  हे तुम्हीच शिकवलेत. वैचारिक स्पष्टता कशी असावी आणि दुसऱ्यांच्या भिन्न मतांचा आदर करत आपल्या भूमिकेवर ठाम कसे रहावे, हे मी तुमच्याकडूनच शिकलो.

वडील आणि मुलगा हे एक बहुआयामी आणि विविध स्तर असलेले नाते. या नात्याबद्दल काही गोष्टी वैश्विक असाव्यात. तुम्ही गेल्यानंतर अशा काही वैश्विक अनुभवांतून मीही जात आहे. जसे की काही गोष्टी तुम्हाला अधिक मोकळेपणाने विचारायला किंवा सांगायला हव्या होत्या, काही बाबतींत तुम्हाला गृहीत धरले असेल,  काही गोष्टी करावयाच्या राहून गेल्या असतील,  अशा अनेक आठवणी आणि त्या बाबतींत आता केवळ मनात दाटून राहिलेली निरंतर रुखरुख. तुमच्याबद्दलचे प्रेम एक व्यक्ती म्हणून तुमच्याबद्दल असलेल्या आदरातून आले होते,  वडीलकीचा धाक त्यात नव्हता आणि त्यामुळेच मी तुमच्यासोबत मोकळेपणाने बोलूही शकायचो. गेली काही वर्षे विशेषतः तुमच्या आजारपणानंतर आपण अधिकच जवळ आलो. साधारण पाच-सहा वर्षांपूर्वी तुमची तब्येत बरी नसल्याने मी भारतात तुम्हाला भेटायला आलो होतो आणि मी असतानाच तुमची तब्येत अचानक खालावत गेली. जवळपास चोवीस  तास  आम्ही सगळे तुमच्या उशाशी बसून असायचो. मी पाच मिनिटे जरी इकडे तिकडे गेलो तरी तुम्ही खूप अस्वस्थ व्हायचात.  अनेक गंभीर आजारांनी एकदाच डोके वर काढल्याने तुमची तब्येत खूपच गुंतागुंतीची आणि नाजूक झाली होती. अशा परिस्थितीत तुम्हाला सोडून मी अमेरिकेत परत येण्याचा प्रश्नच नव्हता.  सगळे एका क्षणात सोडून असे भारतात राहणे हे बऱ्याच जणांना अव्यवहार्य वाटले. किंबहुना प्रकृती खालावण्यापूर्वी तुम्हीही मला तसे सुचवले होते. मात्र माझ्यापुढे कुठलीच दुविधा नव्हती. त्यावेळेस माझी प्राथमिकता केवळ तुम्हीच होतात. माणूस असेपर्यंत आपण त्याच्याकरता किती असतो हे महत्त्वाचे.  साधारण आठ महिन्यांनी तुम्ही आजारपणातून बाहेर पडलात आणि मी समाधानाने अमेरिकेत परतलो. या आजारपणानंतर शेवटची पाच-सहा वर्षे तुम्ही आनंदाने आणि समाधानाने जगलात. खूप सारी पुस्तके वाचलीत, चांगले चांगले चित्रपट बघितलेत, आणि हो,  नित्यनियमाने रोजच्या रोज त्या दिवसात काय काय वाचले किंवा काय विशेष घडले याच्या नोंदी तुम्ही तुमच्या सुवाच्च हस्ताक्षरात करून ठेवायचात आणि रोज रात्री माझा फोन आला की मला ते वाचून दाखवायचात. या नोंदी केलेल्या वह्या हा आता माझा एक अमूल्य ठेवा आहे. वाचनाची आवड तुम्हाला होतीच आणि निवृत्तीनंतर ती जोपासायला निवांत वेळही मिळाला. मराठी, हिंदी आणि इंग्लिशमधील अभिजात साहित्याचा तुम्ही असोशीने आनंद घेतलात. मी ऑनलाइन पुस्तके ऑर्डर करायचो, तुम्ही ती वाचून काढायचात आणि मी भारतात आलो की ही पुस्तके माझ्यासोबत घेऊन यायचो, असा आपला गेल्या कित्येक वर्षांचा शिरस्ता. मला आठवतंय मी लहान असताना तुम्ही पुस्तक घेऊन वाचत बसायचा, लगोलग तुमचे अनुकरण करून मीही एखादे पुस्तक उचलायचो. अमुक एक पुस्तक वाच असे तुम्ही कधी फारसे सांगितले नाही. मात्र मी काय वाचत आहे यावर तुमचे बारीक लक्ष असायचे. मी सहावीत असताना एकदा वाचनालयातून ताजमहाल या विषयावर एक प्रचारकी थाटाचे पुस्तक घेऊन आलो होतो. तुम्ही लागलीच मला हटकले आणि ते पुस्तक लगेच परत करायला लावले.  देशा-विदेशातील उत्तमोत्तम चित्रपट  देखील बघायला तुम्हाला आवडायचे. असाच एक चिनी भाषेतील गाजलेला सिनेमा मी तुम्हाला पाठवला होता ज्याचे नाव होते 'द पोस्टमन इन द माऊंटन'. पिता-पुत्र नात्यावर आधारित असा हा सिनेमा. हा सिनेमा बघितल्यानंतर तुमचे मित्र आणि लेखक श्री. मधुकर धर्मापुरीकर यांना आपल्या दोघांच्या नात्यातील जवळीकीची आणि  आपल्यात असलेल्या संवादाची आठवण झाली होती.  मी दहावीनंतर शिक्षणासाठी घराबाहेर पडलो. त्यानंतर माझे निर्णय मीच घेत गेलो आणि अमेरिकेत येऊन स्थायिक झालो. तुमचा पाठिंबा नेहमी होताच. तुम्ही खूप कधी बोलून दाखवत नसला तरी  मी व्यक्ती म्हणून कसा घडलो याचे कौतुक तुमच्या डोळ्यांत दिसायचे आणि त्याबाबतीत तुम्ही समाधानी असावा असे वाटायचे. कधीतरी पत्रांद्वारे आणि कधी तुमच्या कवितांतून तुम्ही व्यक्त व्हायचा.

व्यवस्थितपणा, स्वच्छता ,नीटनेटकेपणा, काटेकोरपणा हा तर तुमचा स्थायीभाव.  प्रकृतीच्या कारणामुळे तुम्ही प्रवास टाळायचात, मात्र ही कसर तुम्ही उत्तम संगीत, दर्जेदार साहित्य, अभिजात जागतिक चित्रपट  यांचा आस्वाद घेत भरून काढलीत. रोजच्या आयुष्यातील छोट्या-छोट्या गोष्टींतून तुमची कलात्मकता, सौंदर्यदृष्टी आणि सजगता दिसून यायची.  तुमच्याकडच्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक उपकरणे हे वर्षानुवर्षे टिकायचे. पुस्तके अनेकदा वाचून झाली तरी नवीकोरी वाटायची. सत्तरच्या दशकात तुम्ही रेकॉर्ड प्लेअर घेतले. त्यावरील धूळ साफ करण्यासाठी तुमचा एक आवडता रुमाल होता. पुढे काही वर्षांनी कॅसेट प्लेयर आले, नंतर सीडी प्लेयर आले तरी त्यांना साफ करण्यासाठी सुद्धा तोच रुमाल होता आणि जो अजूनही माझ्याकडे आहे. धोब्याला देण्यासाठी ठेवलेले कपडे व्यवस्थित घडी करून ठेवलेले असायचे जणू काही ते इस्त्री करून परत आले आहेत. वाचून झालेले रद्दीचे पेपर व्यवस्थित लावून एकावर एक ठेवलेले असायचे. घरातल्या फर्निचरची जागा, त्यांचा एकमेकांशी काय कोन असावा, हे सगळे तुमच्या मनात ठरलेले असायचे आणि ते थोडे जरी बिघडले की तुम्ही लगेच जाऊन पूर्ववत करायचात. तुमच्या काटेकोरपणाशी जुळवून घेताना मग बऱ्याचदा आजूबाजूच्या लोकांची तारांबळ उडायची. एखादी गोष्ट तुम्हाला पटली आणि तुम्ही मनावर घेतले तर वर्षानुवर्षे संयमाने आणि चिकाटीने तुम्ही त्या गोष्टीचा पाठपुरावा करू शकायचा, म्हणजे कितीतरी वर्षे रोज रात्री जेवणात न कंटाळता पालकची भाजी आणि भाकरी खाणे हे केवळ तुम्हीच करू शकाल ! तुम्ही एकच वर्ष शिकण्यासाठी बाहेरगावी हॉस्टेलवर होता आणि तेव्हा तुम्हाला पचनसंस्थेचे काही विकार जडले. त्यामुळे खाण्यापिण्यावर मर्यादा आल्या.  बाहेरगावी प्रवास आणि बाहेरचे खाणे-पिणे तुम्ही टाळायचात. याला अपवाद फारच क्वचित केले असतील. मला आठवतंय मला इंजिनीरिंगसाठी पुण्याला प्रवेश मिळाल्यानंतर तुम्ही मला सोडायला पुण्याला आला होतात. शिवाजीनगरला हॉस्टेलजवळच एका लॉजवर आपण उतरलो. आता दोन-तीन दिवस तुमच्या खाण्या-पिण्याची आबाळ होईल या विवंचनेत मी होतो. मात्र तुम्ही मला चकितच केलेत. दुसऱ्या दिवशी सकाळी बाजूच्याच इराण्याकडे तुम्ही मला घेऊन गेलात आणि तिथे वेटरला 'दो चाय और बन-मस्का' अशी फर्मास ऑर्डर सोडलीत. माझ्यासाठी ते दोन-तीन दिवस आपले नियम मोडून तुम्ही बाहेरचे खाल्ले.  तुम्ही बाहेर खाण्या-पिण्याचे असे बोटावर मोजण्याइतके प्रसंग मला आठवतात. तुमचा नेटकेपणा तुमच्या अक्षरातही जाणवायचा. तुमचे अक्षर,  सुरेख ,वळणदार, बघणाऱ्याला अक्षरशः खिळवून ठेवणारं. तुम्ही लिहिलेला प्रत्येक मजकूर जणू काही छापून आला आहे इतका नीटस आणि रेखीव असायचा. माझा जवळचा मित्र डॉक्टर सिद्दीक अहमद याला तुमच्या अक्षराची तुमच्या प्रकृतीचे निदान करण्यासाठी मदत झाली होती.  तुमच्या वक्तशीरपणाचे तर अनेक किस्से आहेत.  अक्षरश: घड्याळाच्या काट्यावर तुमचा दिनक्रम चालायचा. उदाहरणार्थ, सकाळी साडेसात वाजता चहा आणि मग वेळ मोजून बरोबर आठ वाजेपर्यंत अंगणात चकरा. रात्री झोपताना औषधाची एक गोळी घ्यावयाची असायची ती बरोबर नऊ वाजता असे तुम्ही ठरवले आणि मग काटा नऊवर जाण्याची वाट बघत तुम्ही घड्याळाकडे बघत बसायचा ! ना एक मिनिट आधी ना एक मिनीट उशिरा ! तब्येत बरी असताना तुम्ही एका ठराविक वेळी फिरायला जायचा. कॉलनीतले काही लोक गमतीने म्हणायचे की तुझ्या बाबांना बघून आम्ही घड्याळ लावतो ! तुम्ही किती वाजता निघणार, किती वेळ आणि कोणत्या भागात फिरणार या सगळ्यांचाच एक नित्यक्रम होता.  शेजारच्या कॉलनीत सत्तरीतल्या इब्राहिमचाचांचे छोटेसे बांगड्यांचे दुकान आहे. त्यांच्या दुकानासमोरून तुम्ही रोज जायचा. फारसे बोलणे व्हायचे नाही मात्र रोज हसून एकमेकांना सलाम, नमस्कार करणे हे ठरलेलेच. खरेतर त्यावेळी तुम्हाला एकमेकांचे नावही ठाऊक नसावे. नंतर आजारपणामुळे दीर्घकाळ तुम्ही बाहेर फिरायला गेला नाही आणि रोज ठराविक वेळी दिसणारा हा गृहस्थ अचानक गायब कुठे झाला या पेचात इब्राहिमचाचा पडले. इकडे-तिकडे चौकशी केल्यावर त्यांना तुमच्या तब्येतीविषयी कळले आणि आपल्या घराचा पत्ता शोधून काढून ते आवर्जून तुम्हाला भेटायला आले. जुजबी ओळखीवर असे काही ऋणानुबंध निर्माण करण्याची क्षमता असलेला एक वेगळाच चार्म तुमच्या व्यक्तिमत्त्वात होता.

अगदी लहान वयात तुम्ही कविता लिहायला लागलात. या कविता विविध नियतकालिकांत आणि दिवाळी अंकांत प्रसिद्धही झाल्या. तुमचा कल अण्णांनीही ओळखला आणि सतत छान छान पुस्तके तुम्हाला वाचायला आणून दिली. पुढे अनंत भालेराव, राम शेवाळकर, यदुनाथ थत्ते, नरहर कुरुंदकर आणि सरिता पदकी यांनीही तुमच्यातील गुणवत्ता ओळखून तुम्हाला सतत प्रोत्साहन दिले. वयाच्या केवळ पंचविसाव्या वर्षी तुमचा पहिला बालकवितासंग्रह 'पर्‍यांची शाळा' प्रकाशित झाला. या पुस्तकास ज्येष्ठ साहित्यिक नरहर कुरुंदकर यांची मूलगामी प्रस्तावना लाभली. ग.त्र्यं.माडखोलकर, अनंत काणेकर, वा.ल.कुलकर्णी, वा.रा.कांत , भा.रा.भागवत, आनंद यादव या ज्येष्ठ साहित्यिकांनी पुस्तकाची विशेष प्रशंसा केली. या पुस्तकास अनेक पुरस्कार मिळाले, ज्यामध्ये १९७५ सालचा महाराष्ट्र शासनाचा 'कवी केशवसुत' हा बालसाहित्यासाठीचा पुरस्कारदेखील होता. तुम्ही मोजकेच पण दर्जेदार बालसाहित्य लिहिलेत. कोवळ्या मनांची जडण-घडण करण्याची जबाबदारी बालसाहित्यावर असल्याने बालसाहित्य हे सकस असलेच पाहिजे, याबद्दल तुम्ही आग्रही असायचा आणि बालसाहित्यनिर्मिती हे गांभीर्याने आणि जबाबदारीने करावयाचे काम आहे ही जाणीव तुम्हाला नेहमीच होती. 'आतला आवाज' आल्याशिवाय मी लिहित नाही असे तुम्ही म्हणायचा. चमत्कृतीपूर्ण, तरल आणि उस्फुर्त कल्पना, सहज अवतरणारे यमक आणि अनुप्रास, क्षणार्धात मनाचा ताबा घेणारी लय आणि ताल आणि बालसुलभ सुटसुटीत, मजेशीर शब्दरचना ही तुमच्या बालकवितांची काही वैशिष्ट्ये  तुमचे मित्र आणि भूगोलकोशकार श्री. एल. के. कुलकर्णी यांनी तुमच्या एका पुस्तकाला लिहिलेल्या प्रस्तावनेत नमूद केली आहेत.  बोध आणि उपदेशपर बालसाहित्य लिहिण्याकडे तुमचा कल नव्हता. तो तुमचा प्रांतच नव्हता. मुलांच्या भावविश्वाचा भाग होऊन त्यांचे निखळ मनोरंजन करण्यास तुम्ही प्राधान्य दिलेत. मला आठवतंय एकदा याबाबतीत माझ्यासमोरच तुम्हाला कोणीतरी विचारले होते. तुमचे उत्तर माझ्या चांगलेच लक्षात आहे. तुम्ही म्हणालात, " बालसाहित्य हे संस्कारक्षम असलेच पाहिजे ही बाब मला मान्य नाही. बालसाहित्याला ओढून ताणून संस्कारक्षम बनवण्याची आवश्यकता नाही. काही बालसाहित्य हे निखळ मनोरंजनात्मक असू शकते. अर्थात रंजनाबरोबरच आपोआप सहजगत्या संस्कार होत असतील तर चांगलेच. अशा प्रकारच्या मनोरंजनपर कल्पनारम्य बालसाहित्याची एका विशिष्ट वयोगटातील मुलांची भावनिक गरज असते. हा माझा मुलगा. यानेही लहानपणी माझी पुस्तके वाचली आहेत. याचे कुठं नुकसान झाले ?" दोन तीन पिढ्यांचे भावविश्व तुमच्या कवितांनी समृद्ध व रंगीत केले आहे.  घरापुढे थांबला टांगाहे साधारण ५० वर्षांपूर्वी लिहिलेले बालगीत आजही मुलांना तेवढेच आवडते. या गीताचे युट्युबवर (https://www.youtube.com/watch?v=BgftSsyrMdY )  ॲनिमेशन करण्यात आले असून ते बघणाऱ्यांची संख्या काही कोटींमध्ये आहे.  तुम्हाला हे कळाले तेव्हा तुम्हाला त्याचे फारसे अप्रूप वाटले नाही. मुलांपर्यंत गाणे पोहोचत आहे याचा तुम्हाला आनंद होता. प्रसिद्धी किंवा स्वकौतुक यापासून दूर राहण्याची तुमची इच्छा किती अस्सल व प्रामाणिक असायची. बालसाहित्यात वाङ्मयाइतकेच महत्व सजावटीला असते. बालगीतांचा आशय गडद करणारी, त्यांच्याशी समरस होणारे चित्रे पुस्तकात येणे आवश्यक असते. तुम्ही स्वतःच चित्रकार असल्याने ' पर्‍यांची शाळा' या पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि आतील चित्रे व सजावट तुमचीच होती. पुढे तुम्हाला संतुकराव भोकरे बालसाहित्य पुरस्कार, कविवर्य ग.ह. पाटील बालसाहित्य पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले तसेच अंबाजोगाई येथे १९९७ मध्ये भरलेल्या पाचव्या मराठवाडा बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही तुम्ही भूषविले.  तुम्ही प्रौढांसाठी लिहिलेल्या कविता या प्रतिष्ठान, कविता-रती, अनुष्टुभ या प्रतिष्ठित नियतकालिकांत प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र बालसाहित्यनिर्मितीवरच तुमचा भर अधिक राहिला. प्रौढांच्या जगापेक्षा मुलांचे निरागस जग तुमच्या मनाला अधिक भावे. तुमची लाडकी भाची आणि प्रथितयश लेखिका कविता महाजन ही तर तुमच्या बालसाहित्याची विशेष चाहती होती. तुमचे सर्व प्रकाशित आणि अप्रकाशित साहित्य एकत्र करून एक समग्र संग्रह काढण्याची योजना तिचीच. तिने त्यादृष्टीने काम चालूही केले होते. तिच्या अकाली जाण्याने ते अर्धवटच राहिले. मात्र आता ते काम मी हातात घेतले असून लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्याचा विचार आहे.

१९४९ सालचा जन्म म्हणजे स्वातंत्र्यानंतर लगेच जन्म झालेली तुमची पिढी . जन्म झाला वसा या आपल्या मूळ गावी आणि पुढे सारे आयुष्य नांदेडला गेले. नेताजी बोस यांच्या नावावरून अण्णांनी तुमचे नाव 'सुभाषचंद्र' असे ठेवले. तुमच्या लहानपणी त्या काळानुरूप तुमची स्वप्ने आणि तुमच्या पुढील आदर्श होते. पंडित नेहरूंसारखा उदारमतवादी, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि वैश्विक भान असलेला माणूस पहिला पंतप्रधान म्हणून या देशाला लाभला होता. तुम्ही नेहरूंचे चाहते होता. त्यांच्याविषयीची वर्तमानपत्रातली कात्रणे तुम्ही जपून ठेवायचात. तुम्ही तुमचे एक चित्रही नेहरूंना पाठवले होते आणि त्यांच्या कार्यालयाने त्याची दखलदेखील घेतली होती. तुमचे कपाट आवरताना मला त्यात तुमच्या लहानपणापासून जपून ठेवलेल्या वस्तू , पत्रव्यवहार, वर्तमानपत्रातील कात्रणे सापडली आणि त्यातून तुम्ही मला माणूस म्हणून अजून नव्याने उमगलात. यातील बऱ्याच गोष्टी तुम्ही सांगितल्या किंवा दाखवल्या नव्हत्या असे लक्षात आले. चित्रे काढणे, कविता करणे आणि पुस्तके वाचणे याव्यतिरिक्त लहानपणी बऱ्याच गोष्टींत तुम्हाला रस होता. तुम्ही केलेला पोस्टल स्टॅम्प्सचा विषयवार वर्गीकरण केलेला संग्रह तर बघण्यासारखा आहे. तुमचा त्याकाळी अमेरिकेत  एक पेन-फ्रेंड होता आणि ज्याच्यासोबत तुम्ही सांस्कृतिक विविधतेविषयी चर्चा करायचात. बदलत्या जगाबद्दल तुम्हाला खूप उत्सुकता असायची. आठवीत असताना तुम्हाला यदुनाथ थत्ते यांच्या साधना परिवाराने पुण्यात आयोजित केलेलया कुमार कलाकार मेळाव्यात सहभागी होण्याची संधी मिळाली. तेव्हापासून तुमची यदुनाथ थत्ते, सरिता पदकी यांच्याशी जवळीक वाढली आणि पत्रांद्वारे एक अखंड संवाद सुरु राहिला. अशा उपक्रमांतून कुमार वयात तुमच्या कलाविषयक आणि एकंदरच आयुष्याविषयी जाणिवा विस्तारायला मदत झाली. तुमच्या लेखनाविषयी वर्तमानपत्रात आलेल्या बातम्या, पुस्तकांवर आलेले लेख, तुम्हाला मिळालेले पुरस्कार, महाराष्ट्र शासनाने दिलेले स्मृतिचिन्ह, यातले बरेचसे मी तुम्ही गेल्यावर तुमच्या संग्रहात पहिल्यांदाच बघितले. तुमच्या तरुणपणी अनेक ज्येष्ठ साहित्यिकांशी तुमचा पत्रव्यवहार होता. त्यांना तुमच्या लिखाणाचे कौतुक होते. ही पत्रे तुम्ही व्यवस्थित जतन केली होती.

एक व्यक्ती म्हणून आणि एक कलाकार म्हणून तुम्ही जसे घडलात त्याचे बीज अर्थातच आपल्या घरातील वातावरणात, अण्णांनी केलेल्या संस्कारांत होतेच. शिवाय तुम्हाला लहानपणापासूनच भरपूर वाचनाची आवड होती आणि तटस्थपणे स्वतःचे स्वतंत्र विचार करण्याची सवय होती. आपल्या घरातले वातावरण आधीपासूनच धर्म, जात-पात यांच्या पलीकडे गेलेले, मानवतावादी आणि आधुनिक विचारांकडे झुकणारे होते. सणवार उत्साहाने साजरे केले जायचे मात्र रूढी-परंपरांना अनावश्यक महत्त्व नव्हते. तुमच्या लहानपणी नांदेडच्या होळी भागातील आपल्या घरी म्हणजेच 'चित्रशाळेत' अनेक नामवंत कलावंतांचा, साहित्यिकांचा राबता असे. चित्रकला, संगीत, साहित्य, अभिनय या सर्व कलांची आराधना आपल्या घरात चालत असे. या पोषक वातावरणाचा तुमच्या जडणघडणीवर प्रभाव पडला आणि तुमच्यातील सुप्त साहित्य आणि कला गुणांचा विकास झाला. मॅट्रिकच्या परीक्षेत तुम्ही गुणवत्ता यादीत आला होतात. मात्र पुढील शिक्षणासाठी प्रथेप्रमाणे अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय शाखेकडे न वळता कला शाखेत प्रवेश घेण्याचा निर्णय घेतलात. कला शाखेत बी. ए. आणि एम.ए. तर चित्रकलेच्या क्षेत्रात जी.डी.आर्ट आणि ए. एम. या पदव्या तुम्ही मिळवण्यात. एम. ए. (राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन) च्या परीक्षेत तर तुम्ही  मराठवाडा विद्यापीठात सर्वप्रथम आला होतात. मुंबईला जे.जे. स्कूल ऑफ आर्ट येथील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्ही पुणे, मुंबई येथे सहज स्थायिक होऊ शकला असता, मात्र आपल्या वडिलांना साथ देण्यासाठी तुम्ही नांदेडला परत येण्याचे ठरवले. नांदेड येथील 'अभिनव चित्रशाळा' ही मराठवाड्यातील कलाशिक्षण देणारी पहिली संस्था १९५५ साली अण्णांनी  म्हणजे त्र्यंबक वसेकर यांनी  स्थापन केली,  प्रचंड संघर्ष करून फुलवली आणि सचोटीने वाढवली. तुम्ही या क्षणांचे साक्षीदार होता. प्राध्यापक म्हणून या प्रतिष्ठित संस्थेच्या चित्रकला महाविद्यालयात तुम्ही १९७१ साली रुजू झालात आणि ३६ वर्षे सेवा करून प्राचार्य पदावरून निवृत्त झालात. अभिनव चित्रशाळेची स्थापना  ही  मराठवाड्यात कलाक्षेत्रातील एक ऐतिहासिक घटना होती. ही संस्था सुरू झाली तेव्हा अशा प्रकारची एकही खाजगी किंवा सरकारी संस्था मराठवाड्यात नव्हती. मराठवाड्यात चित्रकलेचे शिक्षण देणारी एक स्वतंत्र संस्था असली पाहिजे  या तळमळीने अण्णांना झपाटून टाकले होते.  अतिशय सचोटीने आणि कितीही अडचणी आल्या तरी आपल्या तत्वांशी कुठलीही तडजोड न करता आयुष्यभर अण्णांनी आणि पुढे तुम्ही आपली संस्था चालवली. शासनाचे अनुदान अपुरे होते. अनेक प्रसंगी तुम्हाला पदरमोड करावी लागली, मात्र देणग्या घेणे अथवा इतर प्रलोभने तुम्ही कसोशीने टाळली.  तुम्ही एक विद्यार्थीप्रिय प्राध्यापक आणि त्याचबरोबर एक कठोर प्रशासक होता. तुमच्या शिस्तीचे अनेक दाखले आजही तुमचे विद्यार्थी देतात. तुमचे विद्यार्थी आज नावाजलेल्या ठिकाणी काम करत आहेत आणि निवृत्त झाल्यानंतर देखील त्यातील अनेकांशी तुमचा पत्रव्यवहार होता. आपले चित्रकला महाविद्यालय हे नियमांनुसार चालणारे, जिथे केवळ गुणवत्तेवरच प्रवेश मिळतो. इथे प्रवेश मिळण्यासाठी अतिशय चुरस असे आणि प्रसंगी विद्यार्थी आणि त्यांचे पालक दबावतंत्रांचा आणि इतर मार्गांचा वापर करण्याचा प्रयत्न करत. तुम्ही मात्र तुमच्या तत्त्वांवर ठाम असायचा आणि कुठल्याही दबावाला बळी पडून नियमबाह्य गोष्टी कधीही केल्या नाहीत. एका बड्या राजकारणी व्यक्तीचा तुम्हाला फोन आला होता की वाटल्यास डोनेशन घ्या पण अमुक एका विद्यार्थ्याला ( गुणवत्ता नसताना ) प्रवेश द्या. त्यांना तुम्ही तिथल्या तिथे सडेतोड उत्तर देऊन गप्प केले होते,  हे मला माहीत आहे.   संस्थेचे काम संस्थेच्या महाविद्यालयात कलाशिक्षण देणे एवढेच मर्यादित राहिले नाही तर पुढे त्यातून  बालचित्रकलेच्या प्रसारासाठी आणि विकासासाठी समांतर अशी एक जोमदार चळवळ निर्माण झाली. अनेक तळमळीचे आणि निष्ठावान कार्यकर्ते सहकारी या कलाचळवळीतून निर्माण झाले.  बालचित्रकलेच्या प्रसारासाठी संस्थेने बालचित्रकला परीक्षा सुरू केल्या. या परीक्षा अल्पावधीतच संपूर्ण महाराष्ट्रासह गोवा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि गुजरात या राज्यांतही लोकप्रिय झाल्या. अगदी खेड्यापाड्यातील, तळागाळातील मुलांपर्यंत चित्रकला पोहोचविण्याचे काम या परीक्षांनी केले. या परीक्षांच्या अभ्यासक्रमात मुलांच्या मुक्त-आविष्कार आणि नवनिर्मितीला प्राधान्य देण्यात आले. परीक्षांचा अभ्यासक्रम आधुनिक शैक्षणिक तत्वज्ञान आणि बालमानसशास्त्र यांचा आधार घेऊन तयार करण्यात आला. या चळवळीशी अर्थातच तुमचा खूप जवळून संबंध होता. बालचित्रकलेतून लहान मुलांच्या भावविश्वाशी तुमची जवळची ओळख झाली. त्याचा उपयोग बालसाहित्याच्या निर्मितीसाठी तुम्हाला झाला.

तुमची नेत्रदान आणि देहदानाची इच्छा तुम्ही कित्येकदा बोलून दाखवली होती. एका इच्छापत्रात आपले देहदान करण्यात यावे आणि कुठलेही धार्मिक विधी करू नयेत हे तुम्ही लिहूनही ठेवले होते आणि ते पत्र काही वर्षांपूर्वी माझ्याकडे दिले होते. इतरांसाठी हे काळाच्या पुढचे किंवा धाडसाचे पाऊल असले तरी तुमच्यासाठी ही सहज आणि स्वाभाविक गोष्ट होती. स्वत:ला न पटणाऱ्या सामाजिक, धार्मिक चौकटीत तुम्ही कधीच अडकून पडला नाहीत आणि ज्या वैचारिक तर्कशुद्धतेचा आणि बुद्धिप्रामाण्यवादाचा आयुष्यभर पुरस्कार केला होता, त्याला अनुसरूनच तुमचा शेवटचा प्रवास असणार होता. आजही आपल्या देशात देहदान करणाऱ्यांचे प्रमाण फारच कमी आहे हे वास्तव आहे. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनाच्या दृष्टीने खरे तर  देहदान हे खूप महत्त्वाचे आहे आणि त्याबाबतीत समाजात अधिक जागरूकता येणे आवश्यक आहे. त्यादिवशी भारतातून फोन आल्यानंतर मी लगेच डॉक्टरांना तुमच्या इच्छेबद्दल सांगितले. डॉ. राठी, डॉ. काब्दे, डॉ. सिद्दीक या आपल्या जवळच्या डॉक्टरांनी तातडीने पुढचे सोपस्कार पूर्ण केले. परदेशात मुले असताना भारतात अशी दुःखद घटना घडल्यानंतर मुले भारतात येईपर्यंत मृत शरीर जतन करणे हे मोठे आव्हानाचे ठरू शकते. मात्र देहदान करून तुम्ही तो प्रश्न आपसूक सोडवला होता. नेत्रदान आणि देहदान केलेल्या व्यक्तीचा मृतदेह  चार ते सहा तासांच्या आत अधिकृत वैद्यकीय संस्थानात नेणे आवश्यक असते. मी भारतात येईपर्यंत नेत्रदान, शरीराचे इम्बॅलमिंग आणि इतर कागदोपत्री सोपस्कार पूर्ण झाले होते. मी आल्यानंतर जवळच्या चार-पाच नातेवाईकांसोबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तुमची शेवटची भेट घेण्यासाठी गेलो. तुम्ही शांतपणे विसावला होता. इतर मंडळी थोडी बाजूला गेल्यानंतर मी एकटाच तुमच्यासोबत बराच वेळ बोलत  राहिलो. जे आयुष्य तुमच्या वाट्याला आले ते तुम्ही सुंदर केलेत आणि तुमच्या सहवासाने आमचेही आयुष्य सुंदर आणि समृद्ध झाले.  तुम्ही गेला आणि खरे तर तुमच्यासोबत माझाही एक भाग गेला. आपणच गेलो आहोत असे जाणवत राहिले.  लांबसडक बोटे असलेला तुमचा हात हातात घेऊन मी तुम्हाला शेवटचा निरोप दिला. पुढची साधारण तीस-चाळीस वर्षे तुमच्याशिवाय, केवळ तुमच्या आठवणींवर  काढायची आहेत या वास्तवाची जाणीव झाली. रोज रात्री नऊ वाजता फोनवर ऐकू येणारा तो भारदस्त आणि प्रेमळ आवाज आता पुन्हा कधीच ऐकू येणार नव्हता. अगदी शेवटच्या दिवशी म्हणजे तुम्ही गेला त्याच्या दोन तास आधी मी फोन केला तेव्हा तुम्ही अगदी व्यवस्थित बोलला होता. रोजच्या शिरस्त्याप्रमाणे दिवसभरात काय वाचले, टीव्हीवर काय बघितले आदी गोष्टींची केलेली यादी वाचून दाखवली होती. मी काय वाचत आहे याविषयी तुम्हाला उत्सुकता असायची. मी कुठे प्रवास करत असेल तर त्या ठिकाणाविषयी,  तिथल्या इतिहास आणि संस्कृतीविषयी आपल्या गप्पा व्हायच्या.  तुमचे वाचन प्रचंड असल्याने बऱ्याच गोष्टी तुम्हाला आधीच माहीत असायच्या आणि त्याकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन मला मिळायचा. आता यापुढेही मी जगभरात प्रवास करून विविध अनुभव घेईल, वेगवेगळी पुस्तके वाचेन;  मात्र हे सगळं सांगण्यासाठी तुम्ही मात्र नसणार आहात.  जगाच्या पाठीवरून कुठूनही ज्याच्याशी कुठल्याही विषयावर अर्थपूर्ण संवाद होऊ शकायचा ते हक्काचे ठिकाण निघून गेले आहे. आता मला खऱ्या अर्थाने मोठे व्हावे लागेल.

 

तुमचाच,

पराग

 


 

 

(चित्रकार आणि बालसाहित्यिक श्री. सुभाष वसेकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि कार्याचा आढावा त्यांचे सुपुत्र डॉ. पराग वसेकर यांनी या संवादातून घेतला आहे.)

 

डॉ. पराग वसेकर, वेस्ट लाफाईट , इंडियाना,  यू. एस. ए.,  

 इमेल : psvasekar@gmail.com