Sunday, July 31, 2011

सूर्य उजळणारा संशोधक-उद्योजक - सकाळ -सप्तरंगमधील माझा लेख , ३१ जुलै २०११


डॉ. पराग वसेकर psvasekar@gmail.com

हरीश हांडे आणि नीलिमा मिश्रा या दोघांना यंदाचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराने बचत गट चळवळीला आणि सौरऊर्जेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींना बळ मिळणार आहे. या दोन दिग्गजांचा परिचय....

यंदाच्या रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ. हरीश हांडे यांचे कार्य हे भारतात सौरऊर्जा ही ग्रामीण भागात तळा-गाळापर्यंत यशस्वीपणे उपलब्ध करू शकण्याचे एक उत्तम उदाहरण आहे. अमेरिकेत पी.एच.डी.चे शिक्षण घेत असताना हांडे यांच्या सौरऊर्जा क्षेत्रातील प्रवासाची सुरवात झाली. त्याआधी हांडे यांनी आयआयटी खरगपूरहून पदवी संपादन केली. अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्‌स प्रांतातील युमास- लॉवेल विद्यापीठात "हीट-ट्रान्स्फर' हा त्यांच्या प्रबंधाचा विषय होता. त्या संबंधातील काही कामानिमित्त ते डॉमिनिक रिपब्लिकला गेले असताना त्यांच्या असे लक्षात आले, की त्या देशात भारतापेक्षा अधिक गरिबी असूनही तेथील खेड्या-पाड्यांत सौरऊर्जेवर चालणारे दिवे आहेत...असे असताना मग भारतातील गरीब लोकांना याचा फायदा का होऊ नये या विचाराने त्यांचा ध्यास घेतला. नव्वदच्या दशकाच्या साधारण सुरवातीचा हा काळ होता. डॉमिनिक रिपब्लिकमधून अमेरिकेत परतताच त्यांनी या विचाराचा अक्षरशः पाठपुरावा केला. त्यासाठी त्यांनी आपल्या प्रबंधाचा जुना विषय केराच्या कुंडीत टाकला आणि पुनश्‍च हरिओम करून सौरऊर्जेत पी.एच.डी. करण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेतील शिक्षण संपताच त्यांनी 1995 मध्ये भारतात "सेल्को-सोलर' या आपल्या कंपनीची स्थापना केली. कंपनीची स्थापना तीन मूलभूत तत्त्वांवर आधारभूत होती : 1) ग्रामीण भागातील सर्वसामान्यांना स्थायी (सस्टेनेबल) तंत्रज्ञान परवडू शकते. 2) हे लोक त्या तंत्रज्ञानाची देखरेख करू शकतात. आणि 3) व्यावसायिकता व सामाजिक दृष्टिकोन यांची मेळ घालता येऊ शकते.

तेव्हापासून गुजरात आणि कर्नाटक या दोन राज्यांत 25 सर्व्हिस सेंटर व साधारण 170 कर्मचाऱ्यांसह कंपनीने आपला विस्तार केला आहे आणि एक लाखाहून अधिक सोलर सिस्टिम्स विकल्या आहेत. केवळ चाकोरीबद्ध उत्पादन करून ते विकण्यापेक्षा त्याही पलीकडे जाऊन एखाद्या खरेदीकर्त्याची नक्की गरज काय आहे ? त्यानुसार आपल्या प्रॉडक्‍टमध्ये काय बदल करता येईल, की जेणेकरून ते त्या-त्या व्यक्तिसापेक्ष अधिक किफायतशीर आणि अधिक उपयोगी ठरेल, या गोष्टींकडे कंपनीचे लक्ष असते. कर्नाटकातील प्रत्येक भागात त्या-त्या भागातील बोली भाषा बोलणारे तंत्रज्ञ हे तत्पर तुमच्या सेवेसाठी उपलब्ध आहेत. तसेच, कंपनीच्या सहकार्याने माफक व्याजदरात अनेक वित्तीय संस्थांमार्फत कर्ज मिळण्याची सोय आहे. सोलर लाइट, हिटर, कुकर अशी अनेक उत्पादने "सेल्को-सोलर' मार्फत केली जातात. कर्नाटक राज्यात सौरऊर्जेबाबत तळा-गाळापर्यंत जागरूकता निर्माण करण्याचे महत्त्वाचे कार्य डॉ. हरीश हांडे आणि त्यांच्या सहकार्यांनी केले आहे. साधारण 95000 घरे, शाळा आदी सौरदिव्यांमुळे उजळल्या गेल्या आहेत; तसेच सौरऊर्जेवर अनेक छोटे-मोठे उद्योग-धंदेही यशस्वीपणे चालत आहेत. 2011 संपेपर्यंत ग्रामीण भागातील साधारण दोन लाख घरांत सौरदिवे लावण्याचा हांडेंचा मानस आहे. दिवे लावण्यासाठी वापरण्यात येणारी सोलर सिस्टिम ही पंखे, रेडिओ आदींसाठीसुद्धा सहज वापरता येऊ शकते. आजही जगातील वीस टक्के, दक्षिण आशियातील चाळीस टक्के आणि भारतातील साठ टक्के लोक नियमित विजेपासून वंचित आहेत आणि त्यांतील बहुतांश लोक हे ग्रामीण भागात आहेत. या पार्श्‍वभूमीवर हांडेनी केलेली सुरवात अतिशय मोलाची आहे. जगभरात ग्रामीण भागातील करोडो लोग आजही इंधन म्हणून लाकूड किंवा केरोसिनचा वापर करतात. ग्रामीण भागात सौरऊर्जा सहजरीत्या उपलब्ध करून दिल्यास लाकूड जाळण्यातून किंवा केरोसिनच्या वापरातून होणारी पर्यावरणाची हानी नक्कीच टाळता येईल.अमेरिकेत स्थायिक होण्याचा आणि तेथील गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीचा मोह टाळून डॉ. हरीश हांडे साधारण पंधरा वर्षांपूर्वी भारतात परतले. ज्या काळात सौरऊर्जेचा आजसारखा बोलबालाही नव्हता, त्या काळात ग्रामीण भागातील जनतेच्या हितासाठी सौरऊर्जेची उत्पादने सुरू करण्याचे द्रष्टेपण त्यांनी दाखविले आणि कर्नाटक राज्यात आपल्या कार्याचे रोप रुजवून; तसेच वेळप्रसंगी तोटा सहन करूनही आपले काम नेटाने पुढे नेले. डॉ. हांडे यांच्या कार्याची यथायोग्य दखल घेऊन यंदाचा अतिशय प्रतिष्ठेचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार त्यांना जाहीर झाला आहे. आपल्या पावलावर पाऊल ठेवून देशातील इतर राज्यांतील तरुणांनी पुढाकार घ्यावा आणि आपल्या कार्याचे लोण देशभर पसरावे, अशी डॉ. हांडे यांची मनापासून इच्छा आहे.
(लेखक सौरऊर्जा क्षेत्रातील संशोधक आहेत.)
Sunday, July 31, 2011 AT 06:00 AM (IST)
Tags: saptrang

Monday, June 6, 2011

सकाळ (सप्तरंग) मधील 'सौर उर्जे' वर माझा लेख

सोलार लाइफ
डॉ.पराग वसेकर (psvasekar@gmail.com)
Sunday, June 05, 2011 AT 06:23 PM (IST)

पुढील वीस वर्षांत जगाची लोकसंख्या आठशे कोटी होऊ शकेल. ऊर्जेची गरज सध्याच्या तुलनेत काही पटींत वाढेल आणि सध्या वीजनिर्माण क्षेत्रात अग्रेसर असलेल्या आण्विक ऊर्जा क्षेत्राने दिवसाला एक अशा गतीने अणुभट्ट्या उभारल्या तरी ही गरज पुरी होण्यासारखी नाही. शिवाय जपानमधील दुर्घटनेच्या पार्श्‍वभूमीवर जगानेही अणुप्रकल्पांचा फेरविचार करण्यास सुरवात केली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर सौरऊर्जेचा विचार केला असता एका तासात पृथ्वीवर पडणारी सौरऊर्जा ही रूपांतरित केल्यास आपली एका वर्षाची ऊर्जेची निकड भागवण्यासाठी पुरेशी असते! मात्र हे प्रत्यक्षात आणण्यासाठी आणखी बऱ्याच संशोधनाची आवश्‍यकता आहे.
अपारंपरिक आणि विशेषतः सौरऊर्जा क्षेत्रातील संशोधनावरील निधी तसेच जागरूकता दिवसेंदिवस वाढत आहे. सध्याच्या पारंपरिक ऊर्जास्रोतांचे पर्याय फक्त अजून काही वर्षेच उपलब्ध असणार आहेत आणि शिवाय त्यांच्या अनेक नकारात्मक बाजूही आहेत. अपारंपरिक ऊर्जाक्षेत्रात सौरऊर्जेशिवाय वायुऊर्जा, टायडल, जिओथर्मल असे पर्याय आहेत. मात्र, भविष्यकाळातील ऊर्जेची गरज काही अंशीच भागवण्याची क्षमता त्यात आहे. सध्या सौरऊर्जा क्षेत्रातील संशोधन हे मुख्यतः सौरऊर्जा ही पारंपरिक ऊर्जास्रोतांपेक्षा कमी खर्चिक करण्यासाठी चालू आहे. जपान, जर्मनी या सौरऊर्जेतील परंपरागत शिलेदारांसकट अमेरिका, शिवाय चीन आणि भारतानेही याबाबत पुढाकार घेतला आहे. सौरऊर्जा निर्मितीत आणि नंतर वापरातही कुठल्याही प्रकारचे अपायकारक वायू वातावरणात सोडले जात नाहीत. त्यामुळे प्रदूषण, ग्लोबल वार्मिंगसारखे इतर ऊर्जाक्षेत्रांशी निगडित वादांचे विषय सौरऊर्जेपासून मात्र चार हात दूरच आहेत. सौर-विद्युतऊर्जा अधिक प्रचलित आणि पारंपरिक ऊर्जास्रोतांशी स्पर्धात्मक करण्यासाठी अनेक देशांत सबसिडी आणि तत्सम योजना राबवल्या जात आहेत. सौरऊर्जा ही काळाची गरज आहे आणि दूरच्या भविष्यकाळात तर त्याला पर्यायच नाही. इतर पर्यायांवरील अवलंबित्व लवकरात लवकर कमी करण्यासाठी भारतासारख्या देशात योजनाबद्ध नियोजनाची आवश्‍यकता आहे.

थोडे सौरऊर्जेमागील विज्ञानाविषयी
बेकरेल या फ्रेंच शास्त्रज्ञाने १८३९ मध्ये सौरऊर्जा परिवर्तन प्रथम शोधले. त्यानंतर १९५४ मध्ये अमेरिकेतील "बेल लॅब' या जगप्रसिद्ध प्रयोगशाळेत पहिला आधुनिक सोलार सेल जन्माला आला. सोलार सेल हा धनभार (P-type) आणि ऋणभार(N-type) असणाऱ्या अर्धवाहक (semiconductor) घटकांच्या एकत्रीकरणाने तयार होतो. अर्धवाहकांचे गुणधर्म हे धातू आणि अधातू यांच्यामध्ये असतात. प्रकाशकण जेव्हा सोलार सेलमध्ये शोषले जातात, तेव्हा त्यांचे ऋणभारीत कण आणि भारमुक्त कण अशा दोन विभिन्न घटकांत रूपांतर होते. हे दोन घटक परस्परविरुद्ध दिशांना आकर्षिले जाऊन बाह्य सौर विद्युतमंडल पूर्ण होते आणि अशा रीतीने सौरऊर्जेचे रूपांतर विद्युतऊर्जेत होते.

सध्याच्या संशोधनाचा कल हा अधिकाधिक कार्यक्षम सोलार सेल तयार करण्यासोबतच मध्यम कार्यक्षम; परंतु तुलनेत स्वस्त आणि टिकावू असे संशोधन पातळीवरील सोलार सेल आणि पुढे चालून सोलार पॅनल तयार करण्याकडे आहे. बहुतांशी सोलार पॅनलसाठी काच हे पाया (substrate) म्हणून वापरले जाते, त्याऐवजी प्लॅस्टिक किंवा इतर अनेक लवचिक धातू पाया म्हणून वापरून सोलार सेलची पुढील रचना त्यावर बांधल्यास तयार होणारे सोलार पॅनल हे वजनाने खूप हलके, लवचिक तसेच वाहतुकीसाठी खूप सोयीचे ठरू शकते. असे हलके आणि लवचिक सोलार पॅनल हे घरावरील छपरे, पाठीवर घेण्याच्या बॅग, कारचा वरचा भाग आदी अनेक ठिकाणी वापरता येतील, अगदी आपण घालतो ते कपडेसुद्धा यापासून तयार करता येतील. हे पॅनल खिशात घडी करून ठेवता येतील आणि पाहिजे तेव्हा काढून मोबाईल त्यावर चार्ज करता येईल! अर्थातच अशा पॅनलची किंमत तुलनेत बरीच कमी असेल. असे तुलनेत स्वस्त, टिकाऊ आणि लवचिक सोलार पॅनल भारतासारख्या विकसनशील देशासाठी आदर्श आहेत. कारण हे सहजरीत्या खेड्यापाड्यात पोचवता येतील. शिवाय सोलार पॅनलपासून तयार होणारा एकदिक विद्युतप्रवाह (Direct current) हा बहुदिक विद्युतप्रवाहात(Alternating Current)  रूपांतर करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या इन्व्हर्टर तंत्रज्ञानातही आमूलाग्र संशोधन चालू आहे. त्यामध्ये सोलार पॅनल आणि इन्व्हर्टर अशी एक संलग्न आणि स्वायत्त यंत्रणा विकसित होत आहे जी वाहतुकीसाठी सुलभ असेल आणि दुर्गम भागातही वापरण्यासाठी सोईस्कर असेल. एकंदरीतच सौरऊर्जा क्षेत्र लवकरच प्रबळ होईल अशी आशा करण्यास हरकत नाही.

सोलार सेलच्या पिढ्या
पहिल्या पिढीतील सोलार सेल हे मुख्यतः सिलिकॉनपासून तयार झाले. या सोलार सेलची कार्यक्षमता (Efficiency) साधारण २०-२५ टक्के असते. मात्र, सिलिकॉन हे मुबलक प्रमाणात उपलब्ध नाही, तसेच सिलिकॉन संगणकाचे चिप्स तयार करण्यासाठी वापरले जात असल्याने महागडेदेखील आहे. सध्या घराघरांवर दिसणारे सोलार पॅनल हे बहुतांशी सिलिकॉनपासून तयार झालेले आहेत.

दुसऱ्या पिढीतील सोलार सेल हे तांब्यासारख्या त्यामानाने स्वस्त आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या धातूंच्या संयोगाने तयार झालेल्या मिश्रधातूंपासून बनविले आहेत आणि त्यांचे सध्या संशोधनाकडून औद्योगिक उत्पादनाकडे स्थित्यंतर चालू आहे. हे दुसऱ्या पिढीतील सोलार सेल "थिन फिल्म सोलार सेल' म्हणून प्रचलित आहेत. यांची उदाहरणे म्हणजे कॉपर-इन्डिअम-गॅलीअम-सेलेनाईड (CIGS) आणि कॅडमियम टेल्युराईड (CdTe). या सोलार सेलची कार्यक्षमता साधारण १२-१५ टक्के असते. दुसऱ्या पिढीतील या तंत्रज्ञानाला "थिन फिल्म' म्हणून संबोधण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे अतिशय कमी जाडीचा (एक मीटरचा दशलक्षावा भाग) मूलद्रव्यांचा थर हा त्याच्यापेक्षा शंभर पटीने अधिक असलेल्या सिलिकॉनच्या थराएवढाच कार्यक्षम असतो. पर्यायाने सिलिकॉनपेक्षा साधारण शंभर पटीने कमी असा मूलद्रव्यांचा वापर होतो.

तिसऱ्या पिढीतील सोलार सेल हे अतिशय स्वस्त असणाऱ्या आणि सुलभ प्रक्रियेने तयार करता येण्याजोग्या सेंद्रिय घटकांपासून तयार करण्यात येत आहेत आणि ते सध्या संशोधन पातळीवर आहेत.

जवळपास सर्वच पिढ्यांतील सोलार सेलच्या सैद्धांतिक आणि प्रायोगिक क्षमतेत तफावत आहे. ही तफावत कमी करण्यासाठी पुंज-भौतिकशास्त्रातील (Quantum Physics) काही मूलभूत तत्त्वे वापरून चौथ्या पिढीतील सोलार सेलवर संशोधनही वेग घेत आहे. प्रकाशकिरण हे विविध तरंगलांबीचे (wavelength) बनलेले असतात. प्रत्येक पदार्थ त्याच्या काही मूलभूत गुणधर्मामुळे काही विशिष्ट तरंग लांबीचेच प्रकाशकिरण शोषून घेऊ शकतो. त्यामुळे चौथ्या पिढीतील सोलार सेलमध्ये असे ३-४ वेगवेगळे पदार्थ एकमेकांवर ठेवून प्रकाशकिरणांच्या दृश्‍य स्पेक्‍ट्रममधील जास्तीत जास्त भाग कसा वापरता येईल या दृष्टीने संशोधन चालू आहे. त्याचप्रमाणे असेही आढळून आले आहे की तोच पदार्थ नॅनो वायरच्या स्वरूपात वापरल्यास त्याचे गुणधर्म बदलून तो वेगवेगळ्या तरंग लांबीचेच प्रकाशकिरण शोषू शकतो.

Tuesday, November 2, 2010

कुहू : कविता महाजन यांची मल्टिमिडीया कादंबरी

भारतातील पहिली मल्टिमिडीया कादंबरी लवकरच येत आहे, कविता महाजन यांच्या ’" कुहू" बद्दल अधिक माहितीसाठी आणि नोंदणीसाठी या वेबसाईटवर जावे:

http://kuhoo.in/

तसेच कुहूचा ब्लॉग : http://ku-hoo.blogspot.com/

Tuesday, August 24, 2010

माझे आजोबा त्र्यंबक वसेकर २००६ साली दिवंगत झाले, त्यानंतर महाराष्ट्र-टाईम्समध्ये प्रकाशित झालेला माहितीपर लेख

पुण्या-मुंबईपासून दूर असल्यामुळे मराठवाड्याच्या कला क्षेत्राची महाराष्ट्राला फारशी ओळख नाही, पण त्यामुळे तेथल्या कलावंतांचे महत्त्व कमी मानता येणार नाही. स्वातंत्र्यानंतरच्या काळात नांदेड शहरात कलाक्षेत्राला एकदम सुगीचे दिवस आले. पं. अण्णासाहेब गुंजकरांनी या भागात पं. पलुस्करांचे अनुयायित्व पत्करून संगीताचा प्रसार केला, इतिहासाचार्य वि. अ. कानोले यांनी इतिहास संशोधन मंडळाचा पाया घालून तेथल्या प्राचीन संस्कृतीचा शोध घेतला, दे. ल. महाजन यांनी साहित्य चळवळीचा पाया घातला तर गुरुवारीच दिवंगत झालेल्या त्र्यंबक वसेकर यांनी मराठवाड्याला चित्रकला शिकवली.

वसेकरांना चित्रकलेचा वारसा आजोबांकडून मिळाला. त्या बळावर त्यांनी चित्रकला शिक्षकाची नोकरी केली; परंतु चित्रकलेला शास्त्रीय शिक्षणाची जोड देण्याची आवश्यकता वाटल्यामुळे वसेकर हैदराबादच्या आर्ट स्कूलमध्ये दाखल झाले व तेथून त्यांनी जी. डी. आर्टस्ची पदवी मिळवली. त्यानंतर स्वामी रामानंद तीर्थ यांच्या अंबेजोगाई येथील जोगेश्वरी महाविद्यालयात चित्रकला शिक्षकाची नोकरी करीत त्यांनी मदास हायर डिप्लेमा हा चित्रकलेचा उच्च अभ्यासक्रम पूर्ण केला. पण शाळेत मुलांना निव्वळ चित्रकला शिकवून मराठवाड्यातील समाजात चित्रकलेला मानाचे स्थान प्राप्त होणार नाही हे ते ओळखून ते नांदेडला आले व प्राथमिक चाचपणीनंतर त्यांनी १९५५ साली तेथे अभिनव चित्रशाळेची स्थापना केली.

बघताबघता या चित्रशाळेने चित्रकला विद्यापीठाचे स्वरूप धारण केले. या चित्रशाळेतून चित्रकलेचे शिक्षण घेऊन तयार झालेले हजारो शिक्षक नंतर संपूर्ण मराठवाड्यात पसरले व त्यांनी वेगवेगळ्या भागांतील शाळांतून चित्रकला शिकविण्यास प्रारंभ केला. नंतर या चित्रकलेच्या शिक्षणाला प्रमाणित करण्यासाठी अभिनव चित्रशाळेने पहिलीपासून दहावीपर्यंतच्या मुलांसाठी चित्रकलेच्या वेगवेगळ्या पातळीवरील परीक्षा घेतल्या. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्यांना पदव्या व प्रमाणपत्रे देण्याचा उपक्रम अभिनव चित्रशाळेने सुरू केला.

आज मुंबईत जे। जे. स्कूल ऑफ आर्टस्चे जे काम आहे, त्याच तोडीचे काम मराठवाड्यात वसेकरांच्या अभिनव चित्रशाळेने केले. सध्या या चित्रशाळेच्या परीक्षांना महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक व आंध्र प्रदेशातील लाखावर विद्याथीर् बसतात. वसेकर हे १९६० ते ७९ या काळात महाराष्ट्र कला शिक्षण मंडळाचे सल्लागार सदस्यही होते. चित्रकलेबरोबर उत्कृष्ट साहित्य निमिर्तीही त्यांनी केली आहे. त्यांच्या साहित्यकलेचा वारसा सध्या त्यांची नात कविता महाजन चालवत आहे. वसेकर आता आपल्यातून निघून गेले असले, तरी त्यांनी दिलेला चित्रकलेचा वारसा मराठवाड्यात दीर्घकाळ टिकून राहील इतके चित्रकार त्यांनी निर्माण केले आहेत
(आभार : महाराष्ट्र-टाईम्स संपादकीय विभाग)
.

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowarchive.cms?msid=१७५४१५८


http://en.wikipedia.org/wiki/Tryambak_Vasekar

Sunday, October 4, 2009

हरितक्रांतीचे अर्ध्वयू - डॉ. नॉर्मन बोर्लोग

हरितक्रांतीचे अर्ध्वयू डॉ. नॉर्मन बोर्लोग यांचे नुकतेच निधन झाले. हरितक्रांतीनंतर चाळीस वर्षांनी का होईना, पण भारत सरकारने पद्म पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला होता! (एवढा वेळ हरितक्रांतीला लागला असता तर ?)
लहानगा नॉर्मन दुष्काळग्रस्त नॉर्वेतून आई-वडिलांसोबत अमेरिकेत निर्वासित म्हणून आला आणि त्यापुढील त्याचा प्रवास म्हणजे जागतिक कृषीक्षेत्रातील एक दंतकथाच आहे. १९७० साली हाच नॉर्वेजिअन निर्वासित नोबेल पुरस्कार स्वीकारण्यासाठी ओस्लोत हजर होता, हा एक विलक्षण योगायोग.
Dupont या प्रथितयश कंपनीतील नोकरी सोडून डॉ. बोर्लोग १९४४ साली मेक्सिकोत आले आणि पुढील दहा वर्षात अथक परिश्रमाने त्यांनी मेक्सिकोला गहू-उत्पादनात स्वयंपूर्ण केले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. केवळ अमेरिका खंडच नव्हे तर आफ्रिका आणि आशियालाही त्यांच्या मुलभूत संशोधनाचा फायदा झाला. हरितक्रांतीच्या काळात केवळ पाच वर्षात भारताने गहू-उत्पादनात क्रांतिकारक मजल मारली.
आज जगाची लोकसंख्या प्रचंड दराने वाढत असताना डॉ. नॉर्मन बोर्लोग यांचाकडून प्रेरणा घेऊन अधिक संशोधनाची नितांत आवश्यकता आहे. हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

Saturday, September 19, 2009

थोडे EP विषयी

Evolutionary Psychology (EP) हा माझा एक जिव्हाळ्याचा विषय ( मराठीत काय म्हणतात? 'उत्क्रांती मानसशास्त्र'? जाणकारांनी प्रकाश टाकावा.) बऱ्याच वर्षांपूर्वी एका मित्राने Desmond Morris ची ओळख करून दिल्यानंतर त्याच्या 'Naked Ape' आणि 'Intimate Behavior' आदी पुस्तकांची पारायणे झाली. यथावकाश Richard Dawkins, Jared Diamond या दिग्गजांचीही ओळख झाली. त्या सर्वांविषयी सविस्तर नन्तर लिहीन. हल्लीच Geoffrey Miller चे The Mating Mind वाचण्यात आले. मिलेरने अगदी ओघवत्या भाषेत संगीत, साहित्यादी कला यांची उत्क्रांती, जडण-घडण यांचा मानवीय लैंगिकतेशी सांगड घालण्याचा सुंदर प्रयत्न केला आहे. या मानवीय सांस्कृतिक अंगांना तो ' Fitness Indicators' असा शब्द वापरतो. मोरासाठी त्याचा पिसारा जसा Fitness Indicator तसेच काहीसे. मानवी मेंदूच्या सांस्कृतिक उत्क्रांतीमागे Natural Selective Pressures किंवा Survival Instrict पेक्षा Sexual Instict कसे कारणीभूत आहे, हे मिलेरने दाखवून दिले आहे.

Tuesday, September 8, 2009

इस्किलार

इस्किलार : जीएंची एक सुन्दर कथा. जीएंच्या प्रतिभेच्या अर्थातच पासंगालाही पुरणे नाही, मात्र ब्लॉगच्या शीर्षकासाठी त्यांच्या प्रतिभेला अभिवादन करत हा शब्द उसना घेतोय. चला, सुरुवात तर झाली !