Sunday, July 31, 2011

सूर्य उजळणारा संशोधक-उद्योजक - सकाळ -सप्तरंगमधील माझा लेख , ३१ जुलै २०११


डॉ. पराग वसेकर psvasekar@gmail.com

हरीश हांडे आणि नीलिमा मिश्रा या दोघांना यंदाचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराने बचत गट चळवळीला आणि सौरऊर्जेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींना बळ मिळणार आहे. या दोन दिग्गजांचा परिचय....

यंदाच्या रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ. हरीश हांडे यांचे कार्य हे भारतात सौरऊर्जा ही ग्रामीण भागात तळा-गाळापर्यंत यशस्वीपणे उपलब्ध करू शकण्याचे एक उत्तम उदाहरण आहे. अमेरिकेत पी.एच.डी.चे शिक्षण घेत असताना हांडे यांच्या सौरऊर्जा क्षेत्रातील प्रवासाची सुरवात झाली. त्याआधी हांडे यांनी आयआयटी खरगपूरहून पदवी संपादन केली. अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्‌स प्रांतातील युमास- लॉवेल विद्यापीठात "हीट-ट्रान्स्फर' हा त्यांच्या प्रबंधाचा विषय होता. त्या संबंधातील काही कामानिमित्त ते डॉमिनिक रिपब्लिकला गेले असताना त्यांच्या असे लक्षात आले, की त्या देशात भारतापेक्षा अधिक गरिबी असूनही तेथील खेड्या-पाड्यांत सौरऊर्जेवर चालणारे दिवे आहेत...असे असताना मग भारतातील गरीब लोकांना याचा फायदा का होऊ नये या विचाराने त्यांचा ध्यास घेतला. नव्वदच्या दशकाच्या साधारण सुरवातीचा हा काळ होता. डॉमिनिक रिपब्लिकमधून अमेरिकेत परतताच त्यांनी या विचाराचा अक्षरशः पाठपुरावा केला. त्यासाठी त्यांनी आपल्या प्रबंधाचा जुना विषय केराच्या कुंडीत टाकला आणि पुनश्‍च हरिओम करून सौरऊर्जेत पी.एच.डी. करण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेतील शिक्षण संपताच त्यांनी 1995 मध्ये भारतात "सेल्को-सोलर' या आपल्या कंपनीची स्थापना केली. कंपनीची स्थापना तीन मूलभूत तत्त्वांवर आधारभूत होती : 1) ग्रामीण भागातील सर्वसामान्यांना स्थायी (सस्टेनेबल) तंत्रज्ञान परवडू शकते. 2) हे लोक त्या तंत्रज्ञानाची देखरेख करू शकतात. आणि 3) व्यावसायिकता व सामाजिक दृष्टिकोन यांची मेळ घालता येऊ शकते.

तेव्हापासून गुजरात आणि कर्नाटक या दोन राज्यांत 25 सर्व्हिस सेंटर व साधारण 170 कर्मचाऱ्यांसह कंपनीने आपला विस्तार केला आहे आणि एक लाखाहून अधिक सोलर सिस्टिम्स विकल्या आहेत. केवळ चाकोरीबद्ध उत्पादन करून ते विकण्यापेक्षा त्याही पलीकडे जाऊन एखाद्या खरेदीकर्त्याची नक्की गरज काय आहे ? त्यानुसार आपल्या प्रॉडक्‍टमध्ये काय बदल करता येईल, की जेणेकरून ते त्या-त्या व्यक्तिसापेक्ष अधिक किफायतशीर आणि अधिक उपयोगी ठरेल, या गोष्टींकडे कंपनीचे लक्ष असते. कर्नाटकातील प्रत्येक भागात त्या-त्या भागातील बोली भाषा बोलणारे तंत्रज्ञ हे तत्पर तुमच्या सेवेसाठी उपलब्ध आहेत. तसेच, कंपनीच्या सहकार्याने माफक व्याजदरात अनेक वित्तीय संस्थांमार्फत कर्ज मिळण्याची सोय आहे. सोलर लाइट, हिटर, कुकर अशी अनेक उत्पादने "सेल्को-सोलर' मार्फत केली जातात. कर्नाटक राज्यात सौरऊर्जेबाबत तळा-गाळापर्यंत जागरूकता निर्माण करण्याचे महत्त्वाचे कार्य डॉ. हरीश हांडे आणि त्यांच्या सहकार्यांनी केले आहे. साधारण 95000 घरे, शाळा आदी सौरदिव्यांमुळे उजळल्या गेल्या आहेत; तसेच सौरऊर्जेवर अनेक छोटे-मोठे उद्योग-धंदेही यशस्वीपणे चालत आहेत. 2011 संपेपर्यंत ग्रामीण भागातील साधारण दोन लाख घरांत सौरदिवे लावण्याचा हांडेंचा मानस आहे. दिवे लावण्यासाठी वापरण्यात येणारी सोलर सिस्टिम ही पंखे, रेडिओ आदींसाठीसुद्धा सहज वापरता येऊ शकते. आजही जगातील वीस टक्के, दक्षिण आशियातील चाळीस टक्के आणि भारतातील साठ टक्के लोक नियमित विजेपासून वंचित आहेत आणि त्यांतील बहुतांश लोक हे ग्रामीण भागात आहेत. या पार्श्‍वभूमीवर हांडेनी केलेली सुरवात अतिशय मोलाची आहे. जगभरात ग्रामीण भागातील करोडो लोग आजही इंधन म्हणून लाकूड किंवा केरोसिनचा वापर करतात. ग्रामीण भागात सौरऊर्जा सहजरीत्या उपलब्ध करून दिल्यास लाकूड जाळण्यातून किंवा केरोसिनच्या वापरातून होणारी पर्यावरणाची हानी नक्कीच टाळता येईल.अमेरिकेत स्थायिक होण्याचा आणि तेथील गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीचा मोह टाळून डॉ. हरीश हांडे साधारण पंधरा वर्षांपूर्वी भारतात परतले. ज्या काळात सौरऊर्जेचा आजसारखा बोलबालाही नव्हता, त्या काळात ग्रामीण भागातील जनतेच्या हितासाठी सौरऊर्जेची उत्पादने सुरू करण्याचे द्रष्टेपण त्यांनी दाखविले आणि कर्नाटक राज्यात आपल्या कार्याचे रोप रुजवून; तसेच वेळप्रसंगी तोटा सहन करूनही आपले काम नेटाने पुढे नेले. डॉ. हांडे यांच्या कार्याची यथायोग्य दखल घेऊन यंदाचा अतिशय प्रतिष्ठेचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार त्यांना जाहीर झाला आहे. आपल्या पावलावर पाऊल ठेवून देशातील इतर राज्यांतील तरुणांनी पुढाकार घ्यावा आणि आपल्या कार्याचे लोण देशभर पसरावे, अशी डॉ. हांडे यांची मनापासून इच्छा आहे.
(लेखक सौरऊर्जा क्षेत्रातील संशोधक आहेत.)
Sunday, July 31, 2011 AT 06:00 AM (IST)
Tags: saptrang